जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ध्वजवंदनाचा ओटा सुशोभीकरणासाठी भाजपचे नगरसेवक प्रवीण कोल्हे व गायत्री राणे यांनी पुढाकार घेतला. ध्वजवंदनाच्या ओट्याला त्यांनी स्टीलचे रेलिंग करून दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दीड महिन्यांपासून सुशोभीकरणाला प्रारंभ करण्यात आला होता. आज महाविद्यालय व रुग्णालयाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला असून नागरिक उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती देत आहेत. अधिष्ठाता कार्यालय परिसरात असलेल्या ध्वजवंदनाच्या ओट्याला रेलिंग नसल्याचे प्रवीण कोल्हे यांच्यासह गायत्री राणे यांचे दीर अजित राणे यांना माहित झाले. त्यांनी तत्काळ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजवंदनाच्या ओट्याला रेलिंग करून देण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानुसार शुक्रवारी ८ रोजी संध्याकाळी त्यांनी स्टीलचे रेलिंग बसवून दिले. यामुळे सुशोभीकरणामध्ये आणखी भर पडली असून परिसर आकर्षक झाला आहे. भेटीवेळी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रवीण कोल्हे, अजित राणे, कर्मचारी अनिल बागलाणे, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, जितेंद्र करोसिया उपस्थित होते. रविवारी १० रोजी वाहनतळ पार्किंग जागा सपाटीकरण करून देणार असल्याचेही नगरसेवकांनी यावेळी सांगितले.