जळगाव, प्रतिनिधी । शहरातील जळगाव जिल्हा श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे १२ जानेवारीला श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्रमंदिर या संकल्पनेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘राष्ट्रमंदीर टॉक शो’चे आयोजन करण्यात आले आहे. निधी संकलनासाठी जिल्हाभरात कार्यालय सुरू झाले असून उद्घाटन वेळी जवळपास साडेसात लाखांचा निधी जमा झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत क्षेत्रीय संघटने मंत्री श्रीरंग राजे , किशोर चौधरी, प्रतिमा याज्ञीक, देवयानी शेंदुर्णीकर आदी उपस्थित होते.
मंगळवार १२ जानेवारी रोजी ‘राष्ट्रमंदीर टॉक शो’ सायकाळी सात वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात होणार असून या ‘टॉक शो मध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ. यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को-ऑप. सहकारी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, तसेच डॉ. प्रसन्न पाटील (संभाजीनगर) हे प्रमुख वक्ते सहभागी होणार आहेत. तर अॅड. सुशील अत्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. यासोबतच जनजागृतीसाठी शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या आस्थेचे प्रतीक असलेले श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्र मंदिर या संकल्पनेवर या ‘टॉक शो’मध्ये मान्यवर प्रकाश टाकतील. अयोध्येत साकार होणाऱ्या निधी समर्पण अभियानाची सुरुवात १५ जानेवारी पासून होणार असून एक महिना हे अभियान जळगाव जिल्ह्यात होणार आहे. दि. ९ तारखेला पांजरपोळ संस्थान येथे संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दि. १० जानेवारीला शहरातील विविध वस्तीत महिलांनी रामायणातील प्रसंगावर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन समितीने केले आहे. तसेच स्वामी विवेकानंद जयंती युवादिनाच्या निमित्ताने दि.१२ जानेवारीला शिवतीर्थापासून मोटरसायकली रॅली काढण्यात येणार आहे. अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या अभियानाची माहिती होण्यासाठी जनजागरण करण्यात येणार आहे.