पाचोरा, प्रतिनिधी – मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी २७ जानेवारीला काळ्या फिती लावून काम, २८ जानेवारीला दुपारी १ ते २ या वेळेत निदर्शने आणि २९ जानेवारीला लाक्षणिक संप करणार असल्याचे गट “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी महासंघाचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले
या कर्मचा-यांच्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त) आदींना देण्यात आले आहे. यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे हा आंदोलनाचा निर्णय घेतल्याचेही भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.
वर्ग ४ ची पदे निरसित करु नये, १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थश्रेणी पदे निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्वावरील व वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचा-याच्या एका पाल्यास शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, बाह्यस्तोत्राद्वारे ती भरू नयेत, वेतन त्रूटीसंदर्भात खंड २ च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणा-यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील ९२५ चतुर्थश्रेणी बदली कामगारांना शासनसेवेत कायम करावे, सरकारी विमा योजना, मंत्रालय उपहार गृहे, राज्य राखीव पोलिस बल, सार्वजनिक आरोग्य विभाग येथील चतुर्थश्रेणी पदे त्वरित भरण्यात यावीत, अशा २५ मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या असून त्वरित निर्णय घेण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे
. या निवेदनावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्याबरोबरच सरचिटणीस प्रकाश बने, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, यांच्या सह्या आहेत.