जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात उद्या ८ जानेवारी रोजी ४ ठिकाणी ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता ही तालीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेज येथे घेतली जाणार आहे.
आज सकाळी या व्यवस्थेची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक एन. एस. चव्हाण, प्रशासकीय अधिकारी यु. एस. तासखेडकर, अधिसेविका कविता नेतकर यांच्या पथकाने पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्यात. उद्या होणाऱ्या नर्सिंग कॉलेजमधील रंगीत तालीममध्ये २५ कर्मचारी सहभागी होणार आहेत. कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम ही शासकीय मार्गदर्शकानुसार करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या दुसऱ्या गेटवरून ड्राय रनसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
अशी होणार रंगीत तालीम
ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची सराव फेरी आहे. यानिमित्ताने डॉक्टर्स, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी कितपत तयार आहेत, हे तपासले जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी तीन कक्षात रंगती तालीम घेण्यात येणार आहे. यात पहिला कक्ष हा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. दुसरा कक्षात प्रत्येक्ष लसीकरण करण्यात येणार आहे. तर तिसरा कक्ष हा निरीक्षण कक्ष म्हणून राखीव ठेवण्यात आहे. लसीकरणानंतर संबधितास साधारण अर्धा तास या कक्षात तज्ञांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. यानंतर संबधितांना सुटी देण्यात येणार आहे. या कक्षात एखाद्या व्यक्तीस त्रास जाणवत असेल तर त्यांच्यासाठी तत्काळ औषधी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.