जळगाव – कृषी क्षेत्रातील प्रख्यात उद्यमी तसेच गांधी विचारांची ट्रस्टीशीप स्वीकारणारे, तत्त्वशील विचारवंत, चिंतक श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहयोगी अश्विन झाला आणि त्यांच्या पत्नी निर्मला झाला यांनी नुकतीच गुजरात विद्यापीठाद्वारा पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे.
‘गांधीजींच्या सार्वजनिक कामांसाठी आर्थिक साधने संकलनः प्रयत्न, पद्धती आणि व्यवस्थापन’ या विषयात अश्विन झाला यांनी संशोधन केले. जैन हिल्स स्थित गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये झालाजी कार्यरत आहेत. गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयासंदर्भातील हे प्रथम संशोधन आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठया भाऊंनी त्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशन रेसिंडेट स्कॉलरसाठी संशोधन करावे अशी प्रेरणा दिली होती. गांधीतीर्थ मधील वाचनालयातून झाला दाम्पत्यास संशोधनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. अश्विन झाला यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही त्याच कालवधित भवरलालजींच्याच प्रेरणेने ‘महाराष्ट्रातील गांधीजीः कालगणना, प्रसंग आणि कृती’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. प्रस्तुत विषयही भवरलालजींनी सूचवला होता. गुजराथ विद्यापीठात त्यांचे प्रबंध ऑनलाईन सादर झाले. सद्यपरिस्थितीत व्हायवाही ऑनलाईन घेण्यात आला.
परीक्षकांनी त्यांच्या संशोधनासाठी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही मानद पदवी देण्याची शिफारस करत उभयतांच्या कामाची गुणवत्ता आणि संशोधनाची प्रशंसा केली. अभिनंदनीय बाब म्हणजे गुजरात विद्यापीठाने दोन्ही प्रबंध तीन वेगवेगळ्या भाषेत म्हणजे गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीत मुद्रित करण्याचे निश्चित केले असून मराठीतही भाषांतरीत करण्याची सूचना केली आहे. झाला दाम्पत्य गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये सहकारी या नात्याने वर्ष 2010 पासून म्हणून कार्यरत आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या व्यवस्थापन सदस्यांनी फाऊंडेशनने पुरस्कृत केलेल्या या दोन्ही सहकाऱ्यांच्या पीएच.डी संशोधनाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे. झाला दाम्पत्यास गुजराथ विद्यापीठाचे डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे मार्गदर्शन लाभले. या दोघं अभ्यासकांनी आपले संशोधनपर प्रबंध आदरणीय भवरलालजींना अर्पण केले आहेत.