मुंबई- दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार तसेच अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
सोशल मीडियावर पत्रक शेअर करत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नाही असे म्हटलं आहे. येत्या ३१ डिसेंबरला आपण आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहोत. आणि येत्या जानेवारीत पक्ष लाँच करण्यात येईल, असं रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. परंतु आता तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात अलिकडेच रजनीकांत यांची पोस्टर्स झळकले होते. राजकारणापासून दूर राहण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं आवाहन या पोस्टर्समधून करण्यात आलं होतं. ‘वेल्लोर सिटीझन्स विशिंग फॉर अ चेंज’ चे असेच एक पोस्टर समोर आलं होते. पुढच्या वर्षी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजकारणात न उतरण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहेय
रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चा यापूर्वीही बर्याचदा झाल्या होत्या. एवढचं नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा रंगली होती. पण रजनीकांत यांनी मोठी घोषणा करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.