जळगाव- कोरोना काळापासून जिल्ह्यातील बिल्डिंग पेंटर कामगारांचे फार हलाखीचे दिवस सुरू असूनहिंदू मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागणीपर निवेदन अनेक शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. बिल्डिंग पेंटर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हिंदू मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व कामगार जिल्हाभरात बिल्डिंग पेंटरचे काम करतो. कोरोना काळात सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. कोरोना काळात आयुष्य जगणे अवघड होऊन बसले होते. बरेच पेंटर अशिक्षित असल्याने शासकीय योजनांचा त्यांना लाभ घेता आला नाही. जळगाव जिल्ह्यातील सर्व पेंटर कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी निवेदनाद्वारे मागण्या केल्या असून त्या पूर्ण करण्याची विनंती आहे.
तसेच या निवेदनात सदर मागण्या दिल्या आहेत. सर्व बिल्डिंग पेंटर कामगारांना पिवळे रेशनकार्ड मिळावे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड तयार करून मिळावे. बिल्डिंग पेंटरची कामगार आयुक्तांकडे नोंदणी करण्यात यावी. सर्वांना शासकीय योजनांची माहिती देत त्याचा तात्काळ लाभ देण्यात यावा. वयस्कर पेंटरला निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा. पेंटरच्या संस्थेसाठी शासकीय जागा मिळावी. पेंटरच्या शाळाबाह्य मुलांना योग्य शिक्षण मिळण्याची व्यवस्था करावी.
याप्रसंगी हिंदू मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनचे अध्यक्ष इस्माईल खान, उपाध्यक्ष कृष्णा सपकाळे, सचिव अकील खान आदी उपस्थित होते. निवेदनावर सिद्धार्थ वानखेडे, अकील शेख, सुभाष भोई, महेश राव, आसिफ खान, स्वामी यादव, आसिफ शेख, सुभाष कुरेशी, सुदर्शन साहनी, दगडू शाह, करण सिंग, शरीफ पठाण, सैय्यद अमीर आदींच्या सह्या आहेत.