भुसावळ प्रतिनिधी । शहरातील एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए लावल्यानंतर पोलीस प्रशासनाने अवैध गावठी पिस्तुलात गुन्हे दाखल असलेल्यांची झाडाझडती घेतली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी या गुन्हेगारांची माहिती जाणून घेतली.
सोमनाथ वाघचौरे यांची डीवायएसपीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने अलीकडेच एका गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. तर अन्य गुन्हेगारांवरही हद्दपारी आणि एमपीडीएचे प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी अवैध गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या १७ जणांची झाडाझडती घेतली. हे सर्व जण हल्ली काय काम करत आहे? याची माहिती त्यांनी जाणून घेतली. हे सर्व १७ जण सध्या काय करतात? त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन व उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? त्यांचा परिवाराचे पालन पोषण कसे होत आहे? याची माहिती डीवायएसपींनी घेतली. यातून काही नवीन बाबींचे आकलन होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावेळी निरीक्षक रामकृष्ण कुंभार व शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी उपस्थित होते.