मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती सुधारत असताना चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे सरासरी प्रमाण पहिल्यांदाच 3 ते 4 टक्क्यांवर आल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पालिकेच्या माध्यमातून दररोज केल्या जाणाऱया सरासरी पंधरा हजार चाचण्यांमधून सुमारे केवळ 450 ते 500 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही सर्वोत्तम स्थिती असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर केल्या जाणाऱया प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 93 टक्क्यांवर गेले असून सरासरी रुग्णवाढ 0.21 टक्क्यांवर आली आहे. यामध्ये केल्या जाणाऱया चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱया रुग्णांचे प्रमाण घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत कोरोना चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कोविड वाढीच्या काळात तब्बल 30 ते 35 टक्क्यांवर गेले होते. त्यामुळे मुंबईत त्यावेळी अडीच ते तीन हजार रुग्ण नोंदवले गेले जात होते. मात्र मुंबईत आता कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमालीचे घटल्याचे काकाणी यांनी सांगितले.
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधिताच्या काँटॅक्टमध्ये आलेल्यांबाबत वेगाने कार्यवाही केल्यामुळे कोरोना प्रसाराला आळा घालण्यास मदत झाली आहे. यामध्ये 25 डिसेंबरपर्यंत पालिकेने रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तब्बल 41 लाख 81 हजार 167 निकट संपर्क शोधून कार्यवाही केली.
या काँटॅक्ट ट्रेसिंगमध्ये तब्बल 18 लाख 43 हजार 643 हाय रिस्क काँटॅक्ट होते, तर 23 लाख 37 हजार 524 लो रिस्क काँटॅक्ट होते. हाय रिस्कमधील चाचणी केल्यानंतर आढळलेले सुमारे 12 हजार पॉझिटिव्ह पेशंटबाबत आणि निकट संपका&तील दीड लाख नागरिकांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले.
आतापर्यंत 22 लाख 80 हजार चाचण्या
कोरोना वाढीच्या काळात मुंबईत केवळ पाच ते दहा हजार चाचण्या केल्या जात होत्या. मात्र गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढल्यामुळे मुंबईत दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण 15 ते 20 हजारांपर्यंत वाढवण्यात आले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटली असली तरी दररोज सरासरी 15 हजार कोरोना चाचण्या केल्या जात असल्याचे काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत 25 डिसेंबरपर्यंत एपूण 22 लाख 80 हजार 668 चाचण्या करण्यात आल्या असून सरासरी 12 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.