जळगाव जिल्ह्यात सध्या राजकारण्यांचा सीडी, पेन ड्राईव्ह, फाईल, हनी ट्रॅप चा चांगलाच फड रंगला आहे. गण गोवळण प्रमाणे वघनाट्यही रंगत आहे. मध्येच सोगांडे जनतेची करमूणक करीत आहेत. यामध्ये एकमेकांचे उणे दुणे तेही कमरे खालचे शब्द-हावभाव आणि तशी वाक्यरचना वापरून केले जात आहे. खरमरीत चर्चा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी सध्या युट्युब, सोशल साईड, वृत्तपत्र प्रतिनिधींमध्ये चढाओढ सुरू आहे.
एका राजकारण्याने दुसऱ्याविषयी आरोप केला म्हणजे ती मोठी बातमी आपल्या दैनिकात, वेबपोर्टल, युट्युब चॅनेलवर लगेच लागलीच पाहिजे यासाठी तत्काळ बातमी दिली जाते. त्याची लिंकही सर्वत्र लागलीच व्हायरल केली जाते भलेही संबंधीत राजकारणाने केलेला आरोपांमध्ये किती तथ्य आहेत याची कोणतीही शहानिशा केली जात नाही. हे खरोखरच पत्रकारितेच्या नैतिकतेत बसते काय? असा प्रश्न पत्रकार म्हणून प्रत्येकाला पडलाच पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्नांना वाचा फोडणे त्यांना न्याय मिळवून देणे ही पत्रकारिता आता कोणाकडे दिसत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही.
राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वाणी यांनी महिलेला सोबत घेऊन हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यावेळी पत्रकारांनी महिला व काही पुरावे मागितले तर पुढच्या पत्रकार परिषदेत देतो असे सांगून टाळले. वाणी यांनीही तोच कित्ता गिरविला. यात पुढे आले विनोद देशमूखचे नाव यानंतर कल्पना पाटील यांनी अजगराची उपमा देत पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व काही ओपन करते असे सांगितले. आता पारस ललवाणी, प्रफुल्ल लोढा यांचीही पत्रकार परिषदेत झाली. यातही तोच कित्ता पुढच्या पत्रकार परिषदेत तुम्हांला सगळ्यांना पुराव्यांनिशी माहिती देतो.
जर पुरावे असतील तर ते द्या नाहितर पत्रकारांचा उगाच वेळ कशाला वाया घालवतात. पण पत्रकारसुद्धा आपला वेळ वाया घालवतात. अशा लोकांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घाला. बातम्या प्रकाशित करू नये जेणे करून स्वत:च्या प्रसिद्धी साठी पत्रकारांच्या नैतिकेतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार नाही हे वास्तव सर्वांनीच समजून घेतले पाहिजे. उठ सुठ पत्रकार परिषद घ्यायाची आणि आरोप करायचे त्या आरोपांना आधार असेल तर ठिक मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना किंवा त्यांच्या शंकांचे निरसण न करता आरोप करणे म्हणजे स्वत:च्या फायद्यासाठी पत्रकारांचा उपयोग करण्यासारखे म्हणता येईल. यात पत्रकार परिषद लाईव्ह करणारांची चांगलीच गोची होत आहे त्याला कारणही तसे आहे. कमरेखालची अश्लील भाषा राजकीय मंडळी वापरत असून सर्वांसमोर ते लाईव्हच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे समाजासमोर आपण काय दाखवित आहोत याचेही भान ठेवले पाहिजे.
राजकारण्यांची प्रतिमा किती स्वच्छ आहे हे तर प्रत्येकाला माहितच असते मात्र लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून आपल्याकडे पाहणारे सर्वसामान्य नागरिक पत्रकारांच्या या वर्तनाकडे कोणत्या नजरेने बघतिल याचीही भिती ठेवली पाहिजे. कोणताही समाज सक्षम करायचा असेल तर त्याला आरसा चांगला दाखविला पाहिजे जेणे करून त्यातून त्याचे प्रतिबिंब त्याला दिसेल. आपण अशा घाणेरड्या पत्रकार परिषदा दाखविणे बंद केले पाहिजे.
अमेरिकेचे ट्रम्प यांनीही खोटे आरोप चालु ठेवले असता तेथील पत्रकारांनी त्यांचे कव्हरेज बंद केले होते ही नैतिका भारतीय मीडीया किंबहुना जळगावमधील मीडीया पाडेल का हा प्रश्न आहेच. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीसुध्दा नुकतेच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारीता कुठल्यास्तरावर जात आहे याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. नाथाभाऊ म्हणजे राजकारणातील मुरंबी नेते त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी ‘बेवड्यां’च्या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी मिळत असल्याची खंतसुद्धा व्यक्त केली. एकमेकांची उणे दुणे काढणे हे राजकारण्यांचे कामच पण आपण समाजासमोर काय दाखवतो त्यावरच आपली नैतिका समजते..
नाजनीन शेख
संपादक, दिव्य जळगाव