जळगाव – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, आपल्याला भोसरी येथील भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने पाठविलेली नोटीस मिळाली असून आपण या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच याप्रसंगी त्यांनी आपण लोढा सारख्या दारूड्यांना ओळखत नसल्याचेही सांगितले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काल ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काल या प्रकरणी खडसे यांनी आपल्याला नोटीस मिळाल्यानंतरच बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. या अनुषंगाने आज खडसे यांनी आपल्या जळगावातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
सदर पत्रकार परिषदेत एकनाथराव खडसे म्हणाले की, भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी आपल्याला ईडीने नोटीस बजावली असून चौकशीसाठी ३० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. या अनुषंगाने आपण स्वत: अथवा आपले प्रतिनिधी चौकशीसाठी हजर राहून ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली.
हा भूखंड आपण नव्हे तर आपल्या पत्नीने खरेदी केलेला आहे. या प्रकरणी एसीबी पुणे, एसीबी नाशिक, झोटींग समिती आणि इन्कम टॅक्स विभाग या चारही ठिकाणी आपली आधीच चौकशी झालेली असून आपण यासाठी स्वत: कागदपत्रांसहीत उपस्थित राहिलेलो आहोत. या नुसार आपण ईडीलाही सहकार्य करणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.
तसेच काल प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या टिकेवर त्यांनी थेट उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, आपण कोणत्याही दारूड्या व्यक्तीने केलेल्या आरोपांना भीक घालत नाही. यावर आपण सध्या काही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.