एरंडोल प्रतिनिधी । आदर्श शिक्षक किशोर कुंझरकर खून प्रकरणी दोघे आरोपींना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावण्यात आली आहे.
आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा हत्येप्रकरणी एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील वाल्मीक रामकृष्ण पाटील व आबा भारत पाटील या दोघांना १९ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या आरोपींची पाच दिवसाची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या कोठडीत आरोपींकडून कुंझरकर यांचा मोबाईल, ज्या दुचाकीवर बसून त्यांना पळासदड रस्त्यावर नेले होते ती दुचाकी व खून झाला त्यादिवशी आरोपींनी घातलेले कपडे जप्त करण्यात आले. कुंझरकर यांचे पाकीट व त्यातील एटीएम कार्ड व अजून काही वस्तू मिळू शकल्या नाहीत ही बाब पोलीसांनी न्यायालयात मांडली. या अनुषंगाने न्यायाधीश नितीन बंडगर यांनी दोघांना पुन्हा तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय तुषार देवरे, मिलिंद कुमावत करत आहेत.