यावल (रविंद्र आढाळे) – पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तुळीज पोलीस स्थानकामध्ये पोलीस निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून पोलीस काँस्टेबल सखाराम भोये यांनी आत्महत्या केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केले आहे.
राज्यातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील असलेले तुळींज पोलीस स्टेशन येथे पोलीस काँस्टेबल मयत सखाराम भोये आदिवासी कर्मचारी वाघेरपाडा ठाणापाडा येथील रहिवासी यांनी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या सततच्या अमानुष वागणुकीला व जातीवाचक शिवीगाळला कंटाळून पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बुधवार दि 23 डिसेंबर 2020 रोजी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना घडली.
हा प्रकार अतिशय गंभीर असून या आदिवासी बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, रॅगिंग ऍक्ट प्रमाणे गुन्हा, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांव्ये गुन्हे दाखल करण्यासाठी व पोलीस आयुक्त पालघर यांना या प्रकरणी जाब विचारण्यासाठी व या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व संघटना, पदाधिकारी यांनी आपल्या पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व गृहमंत्री यांना निवेदन पाठवण्यात यावे असे आवाहन व सूचना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केले आहे .