मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे २२ ऑक्टोबर रोजी प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
एकनाथराव खडसे हे २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एवढंच नाहीतर एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना २२ ऑक्टोबरला १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचे आवाहन सुद्धा केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथराव खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचे कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे.
त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असे पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे, फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.


