मुंबई : आशियाई सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या भारतीय संघास प्राथमिक साखळीत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण याच कामगिरीमुळे संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाची स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खराब सुरुवात झाली. सातव्या फेरीत फिलिपिन्सविरुद्ध १.५-२.५ अशा पराभवास सामोरे जावे लागले.
सूर्यशेखर गांगुली कर्णधार असलेल्या संघाने त्यानंतर बांगलादेशला ३.५-०.५ असे पराजित केले; पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-२ बरोबरीवर समाधान मानले. भारताची उपांत्यपूर्व फेरीत लढत मंगोलियाविरुद्ध २३ ऑक्टोबरला होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सोळावर्षीय निहाल सरीन चमकदार विजय मिळवत असताना बी अधिबन पराजित झाला.
सेथुरामन आणि शशिकिरणची लढत बरोबरीत सुटली. बांगलादेशविरुद्ध अधिबन, गांगुली आणि शशिकिरण जिंकले, तर सेथुरामनची लढत बरोबरीत सुटली. फिलिपिन्सविरुद्ध गांगुली पराजित झाला, तर सरीन, सेथुरामन आणि शशिकिरणच्या लढती बरोबरीत सुटल्या.
या स्पर्धेत भारताकडून शशिकिरणची कामगिरी सर्वोत्तम झाली. त्याने नऊपैकी आठ लढती जिंकल्या. सरीनने पाचपैकी चार सामने जिंकले, तर गांगुलीने सातपैकी पाच. दरम्यान, प्राथमिक फेरीत इराणने १५ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवताना फिलिपिन्स आणि मंगोलियास मागे टाकले. आता बाद फेरीच्या लढती सुरू होतील. प्रत्येक लढतीत दोन सामने असतील.