जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा येथील आदिवासी समाजाची महिला…परिस्थिती अत्यंत गरिबीची… कसेबसे प्रवासासाठी पैसे जोडून जिल्ह्याच्या रुग्णालयात मोठ्या आशेनं आली… तिची गंभीर अवस्था पाहून तत्काळ वैद्यकीय अधिकारी धावले… तब्बल सात दिवस उपचार करून महिलेची स्थिती पूर्वपदावर आणली… होय, हे सर्व आशादायी घडलेय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोनाव्यतिरिक्त आजारांची ओपीडी दि. १७ डिसेंबर रोजीपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी पहिलीच रुग्ण म्हणून (वय ४०) या महिलेचा केसपेपर देऊन स्वागत करण्यात आले होते. या महिलेला रक्तस्त्राव होत होता. महिलेला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असल्याने महिलेची प्रकृती खालावत होती. त्यावेळी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी तपासणी केल्यावर महिलेला दाखल करून घेतले. ऑक्सिजन कमी होत असल्याने तत्काळ त्यांना व्हेंटिलेटरची अद्ययावत सुविधा देऊन ऑक्सिजन पातळी वाढविली. तसेच हिमोग्लोबिन २.५ ग्राम होता. ४ रक्ताच्या पिशव्यादेखील गेल्या सात दिवसात महिलेला उपचारासाठी देण्यात आल्या.
सदर महिला ह्या अतिदक्षता विभागात दाखल होत्या. ‘नॉन कोव्हीड’ झाल्यानंतर पहिलेच प्रकरण आव्हानात्मक होते. मात्र अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अश्विनी घैसास, डॉ. सुधीर पवनकर, अधिपरिचारिका निर्मला बालोद यांनी हे आव्हान स्वीकारून यशस्वी उपचार केले. सदर महिलेला पुढील उपचार कॅन्सरच्या रेडिओथेरपीसाठी औरंगाबाद येथील कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे दि. २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले.
औरंगाबाद येथे नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झंवर, रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल यांनी महिलेच्या परिवाराला सहकार्य केले. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांचे कौतुक होत आहे.