मुंबई – मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हा प्रकार नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
सखाराम भोये असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्याने ड्युटीवर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
ही घटना सकाळी 6 वाजता उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्याने एवढे टोकाचं पाऊल का उचलले असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
सखाराम भोये 2003 च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. 2016 पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. बुधवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्रपाळी संपून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी सरकारी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्यावर काही कामाचा ताण होता का की अन्य काही कारण होतो याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.