जळगाव – राज्यात तसेच जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यावर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्य सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत.
त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे न जाता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
1 जानेवारी, 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून जयस्तंभ पेरणे येथे न जाता साध्या पध्दतीने प्रतिकात्मक स्वरुपात अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता घरी राहूनच करावा. असे श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.