जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील चोरांनी चार महिने बंद घर टार्गेट केले आहे. हि घटना २२ डिसेंबर मंगळवार रोजी समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच घरातील संसारोपयोगी एलईडी टीव्ही, लॅपटॉप असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना मंगळवार २२ डिसेंबर रोजी समोर आली आहे. गणेश कॉलनी येथे प्लॉट नं ७१/१ येथे संगीता कमलाकर जोशी ह्या मुलगी भारती जोशी हिच्यासह राहतात. त्याचे पतीचे निधन झाले आहे. दुमजली घर असून वरच्या मजल्यावर जोशी तर खालच्या मजल्यावर त्यांचे सासरे राहतात. जोशी यांची मुलगी भारती ही बाहेती महाविद्यालयात एस.वाय.बी कॉमचे शिक्षण घेत आहे.
२७ जुलै २०२० रोजी संगीता जोशी ह्या मुलीसह मोठ्या मुलीच्या प्रसूतीसाठी नाशिक येथे गेल्या होत्या. यादरम्यान लॉकडाऊन असल्याने संगीता जोशी ह्या नाशिक येथेच मुक्कामी थांबल्या. चार महिन्यानंतर २१ डिसेंबर रोजी संगीता जोशी यांची मुलगी भारती जोशी हि तिचे आजोबा विलास कुळकर्णी यांच्यासोबत जळगावला परतली.
यावेळी भारती हिस घराच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच खिडकी उघडी दिसली. तसेच घरातील लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला असल्याचे दिसून आले. यानंतर भारती हिने तिच्या आईस फोनवरुन घटना कळविली. चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश करत घरातील २५ हजार रुपयांचा ३२ इंची एलईडी टीव्ही, २५ हजारांचे लॅपटॉप तसेच पंजाब नॅशनल बँक व युनीयन बँकेचे सर्टिफिकेट लांबविले असल्याचे दिसून आले. याबाबत भारती जोशी हिने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.