जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर परिसरातील हजरत बिलालट्रस्टतर्फे चंपाषष्ठी (देवदिवाळी) निमित्ताने फळे व भाजीपालाचे वाटप केली. हिंदू व मुस्लीम बांधवांची सामाजिक एकता जोपासली.
हजरत बिलाल ट्रस्टतर्फे शिवाजी नगर हनुमान मंदिर हमालवाडा येथे सर्वसामान्य नागरिकांना पेरू, पपई, चिकू, वांगे, कोथिंबीर, मिरची, कांद्याची पात, भरताचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यासोबत १०० मास्कचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता वाढावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू मुस्लिम बांधव व भगिनींचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
या कार्यक्रमावेळी ४०० किलो वांगी वाटप करण्यात आले व १०० ते १५० किलो सर्व प्रकारची फळेही वाटप करण्यात आली. मागील वर्षापासून हजरत बिलाल ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अखिल पहिलवान यांनी स्वतः शिवाजीनगरच्या संपूर्ण परिसरात लोटगाडीवर भाजीपाला विकून नफा झाला होता. त्या नफ्यातून आज त्यांनी स्वतः फळे वांगे व इतर साहित्य आणून त्याचे वाटप केले.
याप्रसंगी अंकुश कोळी, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका गायत्री शिंदे, विजय बांदल, सामाजिक कार्यकर्ते शकील बागवान, अजमल शाह इकबाल बाबूजी, आरिफ सैय्यद, विलास दलाल व परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव भगिनी उपस्थित होते. अंकुश कोळी व विजय बांदल यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेचे अध्यक्ष सय्यद देखील पैलवान यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.