जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २३ डिसेंबर २०२० पासून दिव्यांग मंडळ सुरु होत असून अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित होत आहे. याबाबत विभागाची तपासणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी नुकतीच केली.
दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. सकाळी ८ ते ११ नाव नोंदणी होणार असून वैद्यकीय तपासणी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत केली जाणार आहे. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात केली जाणार आहे. तपासणीसाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही.
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे.
दिव्यांग मंडळाच्या सेवेचा लाभार्थ्यांनी दर बुधवारी लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.