नवी दिल्ली- भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडा वाढतच चालला आहे. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जवळपास १.१४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५.५ लाख लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सध्या देशात ७.७ लाख रुग्ण उपचार घेत आहेत. तर ६६.६ लाख लोक बरे झाले आहेत.
ही आकडेवारी दिलासा देणारी आहे. कारण अद्याप कोरोनावर लस आलेली नाही. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५५,७२२ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाचा वेग कमी होऊ लागला आहे. दिल्लीमध्ये ३२९९ नवे रुग्ण सापडले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्यू १,१४,६१० झाले आहेत. ६६,६३,६०८ रुग्ण बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयानुसार २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये २०,००० हून कमी कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये ५०००० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आयसीएमआरनुसार (ICMR) १८ ऑक्टोबरपर्यंत कोरोनासाठी एकूण ९,५०,८३,९७६ चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी ८,५९,७८६ चाचण्यांची तपासणी रविवारी करण्यात आली.
हरियाणामध्ये गेल्या साडेचार महिन्यांत पहिल्यांदाच एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी ९५२ नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यानुसार हरियाणामध्ये एकूण १,६४० जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा ७५ लाखांवर गेला असून ७,७२,०५५ रुग्ण उपचार घेत आहेत. लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली.
देशातल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचं नेतृत्त्व व्ही. के. पॉल यांच्याकडे आहे. ‘गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली आहे,’ अशी माहिती पॉल यांनी दिली.
अजून वाचा
Corona : राज्यभरात ११ हजार २०४ जण करोनामुक्त