जळगाव – २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शहरातील सुभाष चौकातील भवानी मंदिराजवळ रिक्षा चालकासोबत वाद घालत असलेल्या तरुणांना हटकले असता त्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्यावर चाकूने वार करून दुचाकी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफीक शेख मजीद मन्यार ( वय .३१ रा. कोळीपेठेतील मन्यार वाडा) यांचे रथ चौकात इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमारास रफीक शेख हे त्यांच्या एमएच १९ सीटी १८३४ ने सुभाष चौकातून रथ चौकाकडे जात असतांना तीन जण एका रिक्षावाल्यासोबत वाद घालत होते. रफीक शेख यांनी त्या तरुणांना हटकले असता त्या तिघांनी रफीक शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच मारहाण करणार्यांपैकी एकाने रफीक शेख यांना त्याच्या हातातील चाकूने पोटावर वार करीत दुसर्याने त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने हिसकावून त्याठिकाणाहून पळ काढला. रफीक शेख यांनी या घटनेची माहिती वसीम शेख, रहिम मन्यार, अक्तर शेख रहीममुल्ला मन्यार, जुलकरनैन शेख गुलाम रसुल यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या तिघा इसमांचा शोध घेतला. मात्र त्या तिघांनी तिथून पळ काढल्याने पोलिसांच्या हातात आले नाही. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी रफीक शेख मजीद मन्यार याच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.