जळगाव- दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज.जे. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे व कार्यकारी संचालक यांच्यासह एकूण चार जणांनी कोट्यवधीचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच लागोपाठ दुसरी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दूध संघाचे मॅनेजर मनोज लिमये यांच्या कारभाराबाबत पुन्हा तोफ डागली आहे.
याप्रसंगी नागराज पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा सहाकरी दूध संघाच्या विद्यामान अध्यक्षा मंदा एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या विविध ७ गैरप्रकारांपैकी दोन आरोपांची यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आज दूध संघाचे अधिकृत पात्रता नसलेले कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी वृत्तपत्रांकडे खुलासा पाठवून माझ्या आरोपांचे खंडन केले. शिवाय, दावा केला होता की माझ्या विरोधात अवमान केल्याची कार्यवाही करणार असे मंडळाच्या प्रसिध्दीपत्रकान्वये केले होते.
मनोज गोपाळ लिमये हाच जिल्हा दूध संघातील विविध गैर कारभाराचा ‘मॅनेजर’ आहे.मॅनेजर म्हणजे मॅनेज करणारा या अर्थाने, कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यासाठी दूध संघाचे जे नियम व अटी आहेत तसेच त्यासाठी जी समिती असते त्यानुसार मनोज लिमये यांची नियुक्ती झालेली असे आरोप करत ते पुढे म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात वडाळा- वडाळी येथे दूध पुरवठा करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत दूध संकलन करुन त्याचा पुरवठा दूध संघाला होतो.
त्या बदल्यात प्रती लिटर ९० पैसे शुल्क संस्थेला दिले जाते, एमडी लिमये याच्या कार्यकाळात वडाळा-वडाळी या संस्थेला २७ लाख ३२ हजार ७३८ रुपये अदा झाले. ही रक्कम ९० पैसे ऐवजी ९० रुपये प्रमाणे अदा झाली. म्हणजेच १०० पट जास्त रक्कम अदा झाली. वास्तविक दूध संघात सर्व आर्थिक व्यवहार हे संगणकावर होतात. त्यात डाटा फिड असतो. अशावेळी ९० पैशांचे ९० रुपये कसे झाले? हा फौजदारी चौकशीचा भाग आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर एमडी लिमये यांनी परस्पर रक्कम वसूल केली. मात्र जाणून-बुजून चूक करणाऱ्यांवर कोणतीही कारवायी केलेली नाही. या संदर्भात जळगाव यांच्याकडे तक्रार केलेली आहे. हा प्रकार खोटा असल्याचे एमडी लिमये यांनी सांगावे. आवाहन पत्रकार परिषदेमार्फत केले आहे.