वावडदा, जळगाव- जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्था,जळगाव यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
रविवारी रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जळगाव शहराच्या महापौर भारती सोनवणे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद,जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,जळके येथील माजी सरपंच रमेश पाटील,काबरा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा,रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी,संस्थेच्या अध्यक्षा सौ.संदिपा वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुमित पाटील हे खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून या गृपच्या माध्यमातून त्यांनी आजवर पाचहजार पेक्षा जास्त विवाह जुळवले आहेत.सामाजिक कार्य करीत असताना ते समाजासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात यामुळेच त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा एस.डी.वाघ यांनी यावेळी सांगितले.आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून यापुढे देखील अशाचप्रकारे सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचे समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना सुमित पाटील यांनी सांगितले.