जळगाव- गेल्या काही दिवसांपासुन जिल्हाभरात ढगाळ वातावरण राहत असल्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता असल्याने बुरशीनाशकांची फवारणी करावी. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
हरभऱ्यावर घाटेअळी पडण्याची शक्यता असल्याने त्यावर 5 टक्के निमार्क किंवा ॲझाडीरेक्टीन (300 पीपीएम) 5 मिली प्रती लीटर पाणी फवारणी करावी. पक्षी थांबे एकरी 10 ते 20 प्रमाणात लावावेत. कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करुन पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत 1-2 अळया आढळून आल्यास अथवा 5 टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसताच एक हेक्टर 8-10 फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवावे. सलग 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8-10 पतंग येत असल्यास किटकनाशाकाची फवारणी/धुरळणी करावी. गव्हावर गेरवा, मावा, तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे. हा रोग होऊ नये यासाठी एम-45 ची फवारणी करावी.
तसेच किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 20 % ईसी या किटकनाशकांचा 1500 लीटर पुरवठा करण्यात आला आहे. हे किटकनाशक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचेमार्फत त्यांचे अधिकृत डीलरमार्फत करण्यात येत आहे. सदरचे किटकनाशके पुरवठा 50 टक्के अनुदानावर (250 मिली पँकींग साईज रु.52.50/-) करण्यात येत आहे. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.