जळगाव – जळगाव जिल्ह्यातील बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे सीए महावीर जैन याच्या जामीन अर्जावर २३ रोजी सुनावणी होणार आहे.
बीएचआर पतसंस्थेत सुमारे अकराशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुजीत बाविस्कर, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व कमलाकर कोळी यांना अटक करण्यात आली असून हे सर्व जण सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहेत.
सदर बीएचआर प्रकरणातील संशयित महावीर जैन याने जामीन अर्ज सादर केला असून यावर सोमवारी सुनावणी अपेक्षित होती. दरम्यान, सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी मुदत मागितल्यामुळे आता २३ रोजी म्हणणे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर युक्तिवादास सुरुवात होईल. तर विवेक ठाकरे व सुजीत बाविस्कर यांच्या जामीन अर्जांवर १६ डिसेंबर रोजी सरकार पक्ष म्हणणे सादर करणार आहे.
तसेच संशयित असलेल्या कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तर या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असणारे बीएचआरचे प्रशासक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर यांचा शोध अजूनही सुरूच आहे.