जळगाव प्रतिनिधी । शहरातील अमृत अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सदोष आहे. वॉटर मीटरचा तिढा हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सोडवावा अशी अपेक्षा जळगाव फर्स्ट संस्थेचे संस्थापक तथा भाजप नेते डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी याबाबतचे पत्र पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकार्यांना दिले.
तीन वर्षे उलटूनही अनेक बाबींचा उलगडा झालेला नाही. जमिनीवर प्रत्यक्षात न होणार्या कामांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रत्यक्षात २४ तास पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या वॉटर मीटरचा त्यात समावेश नाही. पालिका प्रशासन, मजीप्रा यांची प्रमुख भूमिका असतानाही या बाबींचा विसर पडणे न पटणारे आहे.
वॉटर मीटरचा खर्च शासन करणार नसल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जळगावकरांवर न टाकता हा तिढा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोडवावा, असे साकडे जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्याम चौधरींनी घातले आहे.
अमृत योजनेतील त्रुटी, आवश्यक बदल, सुधारणा व वॉटर मीटरचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडू नये, अशी मागणी केली आहे. तसेच निविदेत समाविष्ट काँक्रीट कामाबाबत पालिका व मजीप्रा अजूनही संभ्रमात आहेत. ते काम कुठे करायचे हेच स्पष्ट नाही. एकूण निविदेच्या ४२ टक्के रक्कम त्यावर निश्चित केली आहे.
वॉटर मीटरसाठी सुमारे ९५ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे काँक्रीटच्या कामातील ५० ते ६० कोटी रुपये उर्वरित रक्कम पालिका व ग्राहकांकडून वसूल करावी. यामुळे मीटरचा सुमारे १० ते १२ हजार रुपये होणारा खर्च एकट्या ग्राहकावर न पडता तो केवळ २ ते ३ हजारावर येईल. ही रक्कमदेखील २ ते ३ वर्षात वसूल करावी असा मार्ग काढणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. चौधरी यांनी केले आहे.
पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी मजीप्रा संचालक, पाणीपुरवठा मंत्रालयाचे सचिव, नगरविकास मंत्रालयाचे सचिव, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व मक्तेदार यांची एक संयुक्त बैठक लावून उपस्थित मुद्द्यांवर समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा डॉ. राधेश्याम चौधरींनी केली आहे.
अजून वाचा
शिपाई भरती निर्णयाच्या निषेधार्थ १८ रोजी शाळा बंद