जळगाव- राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे तालुक्यातील जळके येथील प्रगतीशिल शेतकरी व श्री गजानन ठिबक सिंचन फर्मचे संचालक पुरुषोत्तम कौतिक पाटील ऊर्फ पी.के पाटील यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पी.के.पाटील हे नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत सुमारे 20 वर्षांपासून शेतात विविध नाविन्यपूर्ण पद्धतीने पिकाची लागवड करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. केळीची लागवड अनोख्या पद्धतीने करुन त्यांची यशोगाथा अन्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. ते शेतकऱ्यांना केळी व ठिबक सिंचन आणि पिकांची राखायची निगा, मालाला योग्य दाम मिळण्यासाठी सुद्धा मार्केटबाबतची माहिती संबंधित शेतकऱ्यांना वेळेवेळी देतात.
त्यांच्या कृषी विषयक, व्यावसायिक व सामाजिक कार्याची दखल अनेक सामाजिक संस्थासह शासन, प्रशासन स्तरावर घेण्यात येवून त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे. ते जळके येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक आणि जळगाव जिल्हा ड्रीप असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनी शेतीसंदर्भात अनेक कृषी प्रदर्शन, शेतीशाळेत सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असतानाच ग्रामविकासाला हातभार लावला. या उल्लेखनाय कार्याची दखल घेवून त्यांना राजनंदिनी संस्थेतर्फे कृषिभूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी कळविले आहे.


