कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत एप्रिलपासून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनीद्वारा ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असल्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ८३ व्या जयंतीदिनी आयोजित भक्तीसुधारस या कार्यक्रम प्रसंगी केली.
‘आपला समाज सातत्य, समर्पण आणि सेवा जोपासणाऱ्या माणसांवर उभा आहे.’ श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचा हा संस्कार जैन परिवारावर खोलवर रुजल्याचीच ही प्रचीती. अशोक जैन यांनी मोठ्याभाऊंच्या काही भावस्पर्शी आठवणी सांगत ही घोषणा केली. साधारणतः 2015 मध्ये जळगाव शहरातील कोणताही नागरीक उपाशी राहू नये असे संवेदनशील विचार मोठ्याभाऊंच्या मनात सातत्याने येत होते. समाजाकडून आपण भरभरून घेत असतो, आपणही समाजासाठी कृतज्ञतापूर्वक नक्कीच काही केले पाहिजे या भावनेतून भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांसाठी सकाळ-संध्याकाळ भोजन उपलब्ध करून देण्यासंदर्भात भवरलालजी जैन उर्फ मोठ्याभाऊंनी अशोक जैन यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला होता. एकूणच या संदर्भात नियोजन काय करता येईल, या संकल्पनेची अंमलबजावणी कशाप्रकारची असेल, नेमके स्वरूप निश्चित होत होते परंतु, प्रत्यक्ष ही संकल्पना सुरू करण्यात काहीना काही व्यत्यय येत राहिला. श्रद्धेय मोठ्याभाऊंचे निर्वाण होईस्तोवर ही संकल्पना प्रत्यक्ष कृतिशील न झाल्याची सल जैन परिवाराला होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी भवरलालजींनी या जगाचा निरोप घेतला. जैन परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक दलुभाऊ जैन यांनी त्यानंतरच्या प.पू. कानमुनींच्या पहिल्या चातुर्मासात भाऊंच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ जैन समाजातील बांधवांसाठी विनामूल्य भोजनालयाची व्यवस्था केली व ती सुविधा आजही सुरू आहे.
कोविड-19 या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला मराणाची दशा दर्शवली तशी जगण्याची दिशाही दिली. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच संवेदनशील वर्तन करून सेवाभाव जोपासला पाहिजे त्यातच आपल्या आयुष्याचे सार्थकत्व आहे या विचारांचे प्रत्यक्ष दर्शन दिसले ते ‘स्नेहाची शिदोरी’ या संकल्पनेत. लॉकडाऊन काळात अनेक प्रकारच्या गंभीर परिस्थितीला जनसामान्यांना सामोरे जावे लागले. भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांना सेवाभावी वृत्तीने घासातला घास देण्याचा जैन परिवाराचा संस्कार येथेही कामी आला. कांताई सभागृहातून 1 एप्रिल 2020 ते 12 डिसेंबर 2020 दरम्यान दोन वेळचे सुमारे 8 लाखाच्यावर भोजन पाकिटे देण्यात आली. स्नेहाची शिदोरी उपक्रम सुरू असताना मोठ्याभाऊंच्या कायम स्वरूपी भोजन उपलब्ध करण्याच्या संकल्पनेची जैन परिवारास सातत्याने आठवण होतीच. ‘स्नेहाची शिदोरी’ अव्याहत रहावी असे जैन परिवाराद्वारा निश्चित करण्यात आले. मोठ्याभाऊंच्या 83 व्या जन्मदिनानिमित्त ‘स्नेहाची शिदोरी’ कायम स्वरूपी राहिल ही अशोक जैन यांनी घोषणा केली. कालानुरूप या भोजनालयाबाबत योग्य ते निर्णय निश्चित घेतले जातील मात्र ही संकल्पना यापुढे निरंतर सुरू राहणार आहे ज्यामुळे शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही.