जळगाव – डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात बेचाळीस वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करुन पाच किलोची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली.
गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी रुग्ण सुनिता (नाव बदललेले) हिच्या पोटात वेदना होत असल्याने तिने जळगाव येथील खाजगी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेतला. त्यावेळी सोनोग्राफी करण्यात आली असून त्यात फ्रायब्राईड (गर्भाशयात गाठ) दिसून आला. तात्पुरती औषधोपचार देण्यात आले. काही वर्षांनी पुन्हा अचानक पोट दुखणे आणि पोट वाढत आहे असे सुनिताच्या निदर्शनास आले तिने पुन्हा आपल्या स्त्ररोग डॉक्टरांची भेट घेतली.
मात्र काही घाबरु नको ऑपरेशनची आता आवश्यकता नाही असे सांगत त्यांनी पाठवून दिले. काही वर्षांनी म्हणजे आता काही दिवसांपूर्वी सुनिताच्या पोटात दुखायला लागले आणि मासिक धर्मादरम्यान रक्तात्रावही अधिक होत होता. तसेच पोट वाढतच आहे असे दिसल्याने तिने पुन्हा रुग्णालय गाठले त्यावेळी पोटात मोठी गाठ असल्याचे सोनोग्राफीच्या रिपोर्टमधून दिसून आले. त्यावेळी खाजगी डॉक्टरांनी उपचार न करता आता दुसर्या दवाखान्या जा असा सल्ला दिला.
त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत सुनिता ह्यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालय गाठले आणि स्त्रीरोग तज्ञांना आपल्याला होणार्या त्रासाची सविस्तर माहिती दिली. डॉक्टरांनी देखील काही चाचण्या करुन घेतल्या यात फायब्रॉईड अर्थात गाठ हि गर्भपिशवीच्या मध्यभागी असून पाच किलोची गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते. या अवस्थेत गर्भपिशवी काढणे अत्यावश्यक असून यातील गुंतागुंतीच्या क्रियेमुळे अतिरक्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता होती तसेच जीवाला धोकाही होऊ शकला असता. याची माहिती सदर महिलेच्या नातेवाईकांना दिली होती. त्यांनी शस्त्रक्रियेसाठी संमती दिली. त्यानंतर डॉ. स्नेहल गवारे, डॉ. दिपीका ललवाणी यांनी शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभांगी चौधरी, डॉ. आकाश, भुलरोग तज्ञ डॉ.महाजन, डॉ. हर्षा देशपांडे यांनी सहकार्य केले. रुग्णालयातील अत्याधुनिक साधन आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने यश मिळाल्याचे डॉ.स्नेहल गवारे यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती उत्तम असून नातेवाईकांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.