नालासोपारा : वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल केले, त्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. माणिकपूर पोलिसांनी सदर पीडित महिलेची तक्रार आल्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला.
वसईत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याने त्यांना उपचारासाठी वसईतील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले होते. आरोपीने पीडित महिला बेशुद्ध असताना मोबाइलमध्ये त्यांचे नग्न व्हिडीओ, फोटो काढून नंतर त्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर पाठवून १० लाखांची मागणी करून पोलिसांत तक्रार केल्यावर सदर व्हिडीओ तसेच फोटो हे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली.
घडलेला प्रकार पीडित महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी-विरोधात आयटी ॲक्ट, खंडणी, विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच रुग्णालयात काम करणारा कर्मचारी आरोपी योगेश सुनील वाघ (१९) याला १२ तासांच्या आत पकडले. त्याने चौकशीत गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करून वसई न्यायालयात हजर केल्यावर १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.