एरंडोल प्रतिनिधी । राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आल्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील-कुंझरकर यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला असून या प्रकरणी सात जणांचे जबाब घेण्यात आले आहेत.
या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी मृत शिक्षक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी अज्ञात आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. किशोर पाटील कुंझरकर हे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मोबाईलवर कॉल आल्यामुळे घराबाहेर पडले होते. यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे आता कॉल करणार्या व्यक्तीवर संशय बळावला आहे.
पोलिसांनी या दृष्टीने तपासणी सुरू केली असून सात जणांचे जबाब घेतले आहेत. तसेच त्यांचे निवासस्थान असणार्या भागातील सीसीटिव्ही फुटेज देखील तपासण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, एपीआय तुषार देवरे हे तपास करत आहेत.