जळगाव,– जिल्हयात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव या विभागाने एका धडक मोहिमेंतर्गत बुधवार दिनांक 9 डिसेंबर,2020 रोजी फैजपूर ता. यावल जि. जळगाव येथे अन्न व औषध प्रशासन, व फैजपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात सुमारे 7,68,000/- रुपये किंमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखु या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला .
या प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे. फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात प्रतिबंधित अन्न पदार्थ साठवलेला असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव व फैजपूर पोलीसांनी संयुक्तपणे मिल्लत नगर भागातील बहिणाबाई मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शेख मोहसीन शेख युनुस उर्फ कल्लू यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या हिरव्या नेटच्या सहाय्याने बनविलेल्या आडोशाच्चा शेडमध्ये छापा टाकला असता प्रतिबंधित अन्न पदार्थ साठविलेला आढळून आला. सदर प्रकरणी प्रतिबंधित अन्न पदार्थावर नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही घेवून फैजपूर पोलिस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर, किशोर साळुंके यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सदर कारवाई ही अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यो. को. बेडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे यामधील मुख्य सुत्राधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुटख्याविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्य आयुक्त अन्न व औषध प्रशासन,विभाग जळगाव यो.को.बेंडकुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.