…योग: कर्मसु कौशलम’ श्रीमदभगवतगीतेतील दुसऱ्या अध्यायातील पन्नासाव्या श्लोकात श्रीकृष्ण यांनी कर्माला योग म्हटले. कोणत्याही कार्यात कुशलता आणि गुणवत्ता ही त्या व्यक्तिच्या ते कार्य करण्यामागील एकाग्रतेवर अवलंबून असते. चांगले कर्म हे ईश्वराप्रती समर्पण भावनेतून करावे ज्यातून परमानंद प्राप्त होतो असा संदेश श्रीमदभगवतगीतेत दिला आहे. जगातील चांगल्या प्रार्थना, धर्म, पंथ, व्यक्तींचे विचार, भावगीतं माणसाला माणुसकीची शिकवण देणारे, माणसाला माणूस म्हणून भावना प्रदान करणारे विचार, सर्व सकारात्मक मनोवृतीचे साहित्य, माणसाचं माणूस म्हणून आदर करतात. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस आपल्या अंतरंगातील माणुसकीला जिवंत ठेवणार असेल आणि नैसर्गिक तसेच संस्कारीत झालेले गुण खरोखरच आचरणात आणणार असेल तर तो सर्वांच्या कल्याणाचाच विचार करेल. ‘मला प्रदान करण्यात आलेल्या दररोजच्या चोवीस तासात मी किती जीवांना सुखावू शकलो’ हाच विचार विश्रांतीपूर्वी करतात तेच जगाच्या कल्याणाचा विचार करतात; करू शकतात. हा विचार श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या कृतीसंपन्नतेचा आदर्श होता.
एका दिवसात कुणीही महात्मा होत नाही. त्यामागे त्यांची तपश्चर्या असते, कठोर परिश्रमांसोबतच प्रयत्नांची पराकाष्ठा असते. आपण योग्य वाटेवर आहोत का? हे होकायंत्राप्रमाणे कसोशीने तपासून घ्यावे लागते. स्वत:च्या विचार-विकारांवर नियंत्रण ठेवावे लागते तरच आपण जगाच्या कल्याणाचा विचार करू शकतो. उदाहरणच द्यायचे झाले तर सायकल चालवितांना दोन्हीं चाकांवर संतुलन ठेवण्यासाठी दोन्ही हातात असलेले हॅण्डल आणि ब्रेकही हातात असला तर ती नियंत्रणात राहते. सायकल ही आपल्याला दररोजच्या वर्तनाबाबत आपण कसे असावे; याचे आदर्श सायकल देते. ‘अनबॅलन्सड लाईफ ही फार विचित्र अशी ट्रॅजेडी ऑफ लाईफ म्हणता येईल.’
गरजा आणि हव्यास यातील फरक ज्यांच्या निरीक्षण आकलनातून लक्षात आला तेच इतरांच्या सुखाचा विचार व्यवस्थित करू शकतात. आवड असणे, गरज असणे, रसिक असणे या सर्व बाबी माणसाला नक्कीच उन्नत करणाऱ्या आहेत, यातील कोणतीही बाब नकारात्मक दिशेला वळली की व्यसनात रूपांतर होते. ती भूक सामान्य भूक राहत नाही. तृष्णा त्यातून जन्म घेते. गौतम बुद्धांना एकदा प्रश्न विचारला गेला, ‘जगातील सर्व दु:खांचं वेदनांचे कारण एका शब्दात सांगता येईल का?’ त्यावर बुद्ध म्हणाले, ‘नक्कीच सांगता येईल, जगातील वेदना, दु:खांचे कारण ‘तृष्णा’ हेच आहे.’ एखादी गोष्ट मला पाहिजे ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे.
जगातल्या कोणत्याही व्यक्तींना किंवा देशाला स्वामित्वाची किंवा अहंकाराची भावना निर्माण होते तेव्हा त्यातून बेफिकिरी वाढत जाते आणि याचे परिणाम काय होतात ते ‘कोवीड-१९’ वरून सद्यस्थितीत आपण अनुभवत आहोत. जगाचं कल्याण करण्याआधी स्वत:ला घडवावं लागतं आणि स्वत:चा शोध तर मनापासून सुरू होतो. जे स्वत:चा शोध घेऊ शकत नाही ते इतरांचा कल्याणाचा विचार करूच शकत नाही. श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी आधी स्वत:चा शोध घेतला. सत्त्वशील विचारांना चारित्र्यसंपन्नतेची जोड देत ‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार’ हे उद्गार त्यातून प्रकट झाले. गरजूंना मदत करणं म्हणजे आपण आपल्याच माणसांना मदत करणे आनंद-आत्मिक समाधान होय हे मानले. सामाजिक दायित्वातूनच आपल्या कर्तृत्वाचा सुगंध चौफेर दरवळत ठेवला. हाच संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर संस्कारीत केला. ‘समाज हे आपल्यावर खूप मोठे ओझे आहे, असे न मानता समाज हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे मानले पाहिजे’ श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या या संस्कांराची प्रचिती पिढ्यान् पिढ्या येत आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही इतरांसाठी जैन परिवार, जैन इरिगेशन कंपनी, कंपनीच्या सेवाभावी संस्था प्रयत्न करीत आहेत. आपल्याजवळील आनंदाचे, सुखाचे क्षण दुसऱ्यांसोबत घालविण्यात धन्यता मानत आहेत. सर्वत्र तणावग्रस्त वातावरण असतानाही श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संस्काराच्या शिदोरीतून सर्वसामान्य गरजूंच्या आयुष्यात उजेड पेरत आहेत. जैन इरिगेशन सिस्टीम्ससारखी आदर्श संस्था, व्यक्ती, आपल्या अवतीभोवती असणे म्हणजे जळगावकर म्हणून खरोखरच अभिमानास्पद वाटते.
श्रद्धेय भवरलालजी जैन यांची सेवासाधना अखंड तेवत ठेवण्यासाठी जैन परिवाराचे प्रयत्न वाखाणण्यायोग्य आहेत. ‘साधना’ ही क्रिया आपल्या आचरणाने घडत असते. साधनेचा धर्म देहाच्या ठायी अनुभवता आला पाहिजे. मूळ ‘साधनेत’ धर्म म्हणजे देव नसून देव हे माध्यम मदत करीत असते. ज्यावेळी ‘साधनेत’ तीन अवस्थांची प्राप्ती होते तेव्हा त्याला ‘साधक’ असे म्हणतात. पहिली अवस्था ‘स्थित्यंतर’ म्हणजे आपल्या मूळ आचार, विचार उच्चार यांचे एकरूपत्त्व होणे. त्यानंतर ‘स्थिती’ ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे आपले स्वत:चे सुख आणि दु:ख यापेक्षा इतरांबद्दल प्रेम निर्माण करणे आणि त्यानंतर साधनेतील अवस्था म्हणजे जगावर ‘परोपकार’ करणे हे होय. साधनेच्या मूळ प्रक्रियेतूनच भवरलालजी जैन यांनी कार्यसंस्कृती घडविली. याच कार्यसंस्कृतीचा संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीवर म्हणजे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन यासह तिसऱ्या पिढीतील अथांग जैन, अभेद्य जैन यांच्यासह परिवारावर संस्कारित झाला आहे. मनुष्याची सेवा करण्यासाठी ‘सेवेत आपण आत्मा ओतू या, आपल्या आत्म्यात सेवा भरू या..’ मोठ्याभाऊंच्या या विचारांतूनच सर्व परिवार कार्यकुशलतेतून समर्थपणे वारसा चालवित आहेत.
‘जिथे जिथे चांगले काम होत आहे, तिथे तिथे आपलेही योगदान द्यावे, चांगले काम ईश्वराचेच काम असते’ या श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांतूनच निरपेक्ष सेवाभावनेतूनच लॉकडाऊन, अनलॉककाळातही सेवासाधना यशस्वी ठरली. माणूस जगविण्याची, मानवतेची चळवळ जळगावकरांसाठी जैन इरिगेशन कंपनीने मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच सुरू ठेवली. स्वत:चा जीव धोक्यात घालून जैन इरिगेशनच्या स्वयंसेवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या ‘सर्वकल्याणम समतत्त्व’ या संस्कारांची प्रेरणा महत्त्वाची होती. ‘ज्यावेळी माणूस स्वत:चे अस्तित्व विसरतो आणि समाजाकडे डोळसपणे बघून दुसऱ्यांच्या भल्यासाठी झटत असतो. तेव्हा त्याच्यात उत्साह संचारलेला असतो आणि हा विलक्षण उत्साह त्याला अद्धितीय काम करण्यासाठी प्रेरीत करीत असतो’ श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या या विचारातूनच जैन परिवारातील सदस्य, कंपनीतील सहकारी काया-वाचा-मन-अर्थ यांच्या एकरूपत्त्वाने सामाजिक सेवा करीत राहिले आणि करीत आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांचे मानसिक संतुलन सांभाळण्यापासून ते त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यापर्यंत सर्वच केले. त्यासाठी स्वत: कोविड सेंटरपर्यंत जैन इरिगेशनचे सहकारी पोहचले. श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे ज्येष्ठ सुपूत्र अशोक जैन ह्यांनीसुद्धा कोविड झालेल्यांना आत्मीक बळ मिळावे म्हणून भरारी फाउंडेशनतर्फे साकारलेल्या कोविड सेंटरला ऑनलाईनच्या माध्यमातून सकारात्मक संदेशासह मार्गदर्शन केले. ‘स्नेहाची शिदोरी’ अंतर्गत दिले जाणारे भोजनाच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी स्वीकारत सुरक्षेसह वेळेवर भोजन पोहचविण्याचे व्यवस्थापनही केले. जळगावकरावर आलेल्या कोणत्याही आपत्तीच्यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने स्वतःचे कर्तव्य समजून विविध प्रकारच्या सामाजिक भूमिका आणि जबाबदाऱ्या स्वयंस्फूर्तिने निभावल्या. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन, अनलॉकच्या काळात सुमारे दहा लाख लोकांपर्यंत भोजन पाकिटे नित्यनियमाने पोहचवली असून अजूनही ते कांताई सभागृह येथे सुरूच आहे. या सेवासाधनतेतून मानवतेचे मूल्य जीवापाड जपले जाते आहे.
क्लेश कष्टासोबतच असंख्य संकटेही येतात ती येत असताना त्याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले तर स्वप्नपूर्तीचे मार्गही त्यात गवसतात. श्रद्धा असावी लागते मातीशी, माणुसकीशी. स्वत: संकटात असताना दीन-दुबळ्यांची मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे आपुलकीचा संस्कार. संस्कार सूर्यप्रकाशासारखे असतात, अंधार पडतो सूर्य मावळतो म्हणून, सूर्यावर प्रकाशाचा प्रभाव तर अंधारावर काळोखाच साम्राज्य असतं. अंधाराला क्षीण करणार्या चंद्राला शितलतेचा संस्कार असतो. संस्कारच माणसाला माणुसकीचा धर्म शिकवितो. श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे संस्कार माणुसकीचा धर्म जोपासणारेच. ‘समाजाचे काम हे समाजावर ऋण नसून कृतज्ञपणे केलेली अल्पशी परतफेड असते’ या मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच संकटसमयी जैन इरिगेशन जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे हे कृतज्ञतापूर्वक आचरणातून जाणीव करून देतात मोठ्याभाऊंच्या खोलवर रूजलेल्या संस्कारांची. सामाजिक बांधिलकी हाच माणुसकी धर्म मानून कृतिशील आचरणातून लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांना प्रकाश देणार्या मोठ्याभाऊंच्या विचारातून जैन परिवार व जैन इरिगेशन कंपनी माणसांच्या सेवेत रमली. शहर निर्जंतुक करणे, सफाई कर्मचारी, नर्स, डॉक्टर, पोलीस कर्मचारी यांची सेवा, कोविड सर्वेक्षण, कोविड जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न, थर्मल गन व ऑक्सीमिटर वाटप, सहकार्यांच्या आरोग्याविषयी काळजी आणि‘स्नेहाच्या शिदोरीतून गरजूंची दोन वेळेची भोजनाची व्यवस्था करणे यातून मोठ्याभाऊंच्या ‘सर्वकल्याणम समतत्त्व’ जपणाऱ्या प्रेरणातीर्थाने परिसर तेजोमय झाला.
मानवजातीला प्रेरणा देणारी भगवदगीता आपल्या कार्यकुशलतेतून प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या आई गौराई दीनदुबळ्यांच्या कथा-व्यथांकडे आपल्या उदार स्वभावाने ‘प्रेमळ बाई’ होतात. ‘समाज सातत्य, समर्पण आणि सेवा जोपासणाऱ्या माणसांवर उभा आहे’ हा संस्कार आई गौराईंकडूनच श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंना मिळाला. जीवनाकडे व्यापक दृष्टीने पाहण्यासाठी संवेदनशील मन लागते. सामाजिक बांधिलकीची कणव हे त्यांना मातृसंस्कारातूनच मिळाले. समाजाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देत राहण्याची वृत्ती, माणुसकीचा धर्म, इतरांच्या चेहऱ्यांवर आनंद आणणारी कृती या जीवनमूल्यांचे दर्शन ‘मुरलेलं लोणचं’ या पुस्तकात घडतं. भवरलालजी जैन यांची कार्यसंस्कृती सारांश स्वरूपात यात पाहायचे असेल तर यामधील अकराशे कोटेशन नक्कीच वाचता येतील; आज श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचा जन्मदिवस त्यानिमित्त ‘ज्या उल्हासाने उभारीने आपण काही घेऊ इच्छितो तेवढ्याच उत्साहाने तत्परतेने व बिनदिक्कत निरपेक्षपणे द्यायला शिका’ या विचारांवर वाटचाल करण्याचा प्रयत्न मोठ्याभाऊंना भाववंदना ठरेल.
– देवेंद्र पंढरीनाथ पाटील
मीडिया विभाग,
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव
मोबा. – 9404955245