जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘नही’ चे काम सुरू आहे. मेहरुण गावठाणकडे जाणारा महामार्गाला लागून असणारा रस्ता डिव्हायडर तसेच रस्त्याच्या कामामुळे बंद होणार आहे. हा रस्ता बंद होऊ नये म्हणून मेहरूणचे नगरसेवक तसेच मनपाचे स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी ‘नही’चा संचालकांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा सुरू आहे. रस्ता बंद होणार नाही असे आश्वासन ‘नही’ च्या संचालकांनी प्रशांत नाईक यांना दिले आहे.
भुसावळ कडे जाणाऱ्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर रत्नाकर नर्सरीजवळ मेहरूण परिसरात जात असलेला रस्ता महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे बंद होणार आहे. त्यामुळे 50 हजार लोकवस्ती असलेल्या मेहरूणच्या नागरीकांचा शहरात जाण्याचा मार्ग बंद होणार आहे. हा मार्ग बंद झाला तर शाळेत जाणारे, नोकरीनिमित्त येजा करणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे. तसेच या मार्गावरती धार्मिक स्थळे, विविध जाती-धर्माचे लोक यांची निवासस्थाने आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न देखील भविष्यात उदभवू शकतो. म्हणून महामार्गवरील रस्ता येण्या-जाण्यासाठी कायम खुला राहावा म्हणून ‘नही’चे संचालक चंद्रकांत सिन्हा यांना नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी गुरुवारी निवेदन दिले.
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील चंद्रकांत सिन्हा यांच्याशी चर्चा करुन मार्ग खुला ठेवावा अशा सूचना केल्या. यामुळे मेहरूणच्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.