जळगाव प्रतिनिधी । शहरातील सालार नगरातील रहिवाशी असलेले ७० वर्षीय वृद्ध ट्रक मागे घेत असतांना चाकाखाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील सलारनगरात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुलामे मुस्तफा (वय-७०) असे जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे.10 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता सालारनगर येथे हॉटेल मानसच्या मागे चालक शब्बीर शरोफोद्दीन खाटीक रा. तांबापुरा हा त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम.एच.15 जी. 4948 हा मागे घेत होता. परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने ट्रकने मागे उभ्या असलेल्या गुलामे मुस्तफा वय 70 या वृध्दास धडक दिली.
धडकेनंतर वृध्द मुस्तफा हे ट्रकच्या मागच्या चाकाखाली दाबले गेले. वृध्दाने आरडाओरड केल्यावर याठिकाणी नागरिकांची एकच गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शी शरीफखान अजीजखान पठाण यांच्यासह अब्दुल रईस रा. सुप्रिम कॉलनी यांनी तातडीने ट्रकच्या चाकाखाली अडकलेल्या मुस्तफा बाहेर काढले व तातडीने मेहरुण येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल केले. या अपघातात मुस्तफा यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी शरीफखान अजीजखान पठाण वय 65 रा. दंगलग्रस्त कॉलनी यांच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक शब्बीर शरोफोद्दीन खाटीक याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत.