जळगाव : बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण सध्या चांगलेच रंगात आलेले आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरला बीएचआर संस्थेच्या निगडित असलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयावर पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने अचानक छापे टाकल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
मात्र, जिल्ह्यातील बड्या नेत्यांशी असलेले जवळचे सबंध आणि भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव येथील प्रख्यात उद्योजक सुनील झंवर यांचा बीएचआर सोसायटी प्रकरणात हात असल्याची माहिती मिळताच राजकीय चर्चेला वेगळेच उधाण आले.
या प्रकरणात सर्वात गाजलेले नाव म्हणजे सुनील देवकीनंद झंवर.
हा औरंगाबाद येथून नव्या किंवा जुन्या दुचाकी आणि रिक्षा जळगावात आणून त्यांना विकत असे. त्यातून त्याला हजार ते दोन हजाराचा नफा मिळायचा. मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात आल्यापासून दीड हजार कोटी रुपयांचा मालक झाला आहे. ही बाब सर्वांना अचंबित करणारी आहे. बीएचआरमध्ये ११०० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणामुळे पोलीस आता त्याचा मागावर असतांनाच तो फरार झाला आहे. सुनील झंवर याचे अनेक किस्से व प्रवास अगदी थक्क करणारे आहेत
१९९० ते १९९२ पर्यंत त्याचा हा वाहन विक्रीचा व्यवसाय सुरु होता. याच काळात तो आरटीओचा एजंट झाला. तेथे वाहन परवाने काढून देणे, कर भरणे यासह इतर कामे करायला. तेथे त्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांशी चांगली ओळख निर्माण झाली. या ओळखीतूनच त्याने रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल सुरु केली . याच काळात तो आमदार असलेल्या गिरीश महाजन यांच्या संपर्कात आला.
गिरीश महाजन यांच्या संपर्कामुळे त्याला आदिवासी समाजातील मुला मुलींना स्वत : च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना वाहन परवाना काढून देण्याचे राज्याचे टेंडर मिळाले. यात त्याने हजारो मुलांची यादी मिळवली, आणि प्रत्यक्षात मात्र शंभरच्या आसपास उमेदवारांना त्याने प्रशिक्षण दिले.
गिरीश महाजन यांच्याशी अधिक मैत्रीपूर्ण सबंध वाढल्याने सुनील झंवर याची थेट मंत्रालयात एन्ट्री झाली. यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी त्याचे जवळचे संबंध येऊ लागले. मुंबईत राहूनच सर्व कामकाज करता यावे यासाठी त्याने आमदार निवासात ३० हजार रुपये महिन्याची एक खोली मिळवली. त्यात कार्यालय चालू करून तिथे संगणक तसेच कर्मचारी यासह इतर सर्व सुविधा तेथे उपलब्ध केल्या. याच काळात गुजरात राज्यात सरकारी बसमधून एक टनापर्यंत माल वाहतुकीचा ठेका मिळविला, त्यातून त्याने चांगलीच मोठी मजल मारली.
मोठ्या नेत्यांसोबत ओळखी असल्याने त्याला अनेक कंत्राट मिळत गेल्याने, तो प्रख्यात उद्योजक बनला. यानंतर त्याला शालेय पोषण आहाराचा ठेका मिळाला. त्यात गिरीश महाजन यांनी मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने शालेय पोषण आहाराचे मोठे कंत्राट त्याला मिळाले . त्यातून त्याला कोटीची माया मिळायला लागली . या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला . वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले . मात्र सुनील झंवरपर्यंत यंत्रणा पोहचलीच नाही . मधल्या काळात एकनाथ खडसे यांनी शालेय पोषण आहाराची तक्रार केली . अधिवेशनात मुद्दा उचललला . तेव्हाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी फक्त आश्वासन दिले , पुढे काहीच झाले नाही .
तसेच कोर्टातून सुनील झंवर याने जय नगरातील गोल्ड जीमच्या समोरील गल्लीत अलिशान बंगला खरेदी केला आहे . फसवणूक प्रकरणात अडकलेल्या जोशी दाम्पत्याचा हा बंगला होता . डीआरटी कोर्टातून अगदी कमी किमतीत त्याला हा बंगला मिळाला . पाळधी येथील साई मंदिराची त्याने उभारणी केली . तेथे नेमलेल्या श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली . त्यात झंवर हा सेक्रेटरी असून शरदचंद्र कासट अध्यक्ष तर त्याचे वडील देवकीनंदन पीतांबर झंवर कार्याध्यक्ष आहेत . नितीन लढा देखील ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष आहेत.
अनेक ठेवीदारांनी आपल्या पोटाला चिमटा लावत एकएक रुपया जोडून या संस्थेत आपले पैसे ठेवले होते. याच गरिबांच्या जीवावर अशा लोकांनी मोठी माया कमविली. बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण हे अचानक आलेल्या वादळासारखे आहे. यामुळे अनेक ठेवीदारांना न्याय मिळेल अशी सर्वांना आशा लागून आहे.