जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सागर पार्क येथे जॉगिंग ट्रॅकचे काम रद्द करावे अशी मागणी राजूमामा भोळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. मुळातच शहरात विकास कामे होत असतांना त्याच्यात आडकाठी शहराचे आमदार कशासाठी आणतात ? असा सवाल करीत जॉगिंग ट्रॅकचे तीन वर्षांपासून काम मंजूर असून त्याचा ठेका मक्तेदारांना दिलेला आहे. असे असताना अचानक काम रद्द करा असे म्हणणे म्हणजे विकास कामांना खीळ घालणे आहे असा आरोप महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला आहे.
जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. ही सत्ता असतांना शहरात विकास कामे करण्यासाठी भाजपने प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी आमदार देखील भाजपचे असताना त्यांनीही विकासकामांसाठी निधी कसा आणता येईल व कसे शहराचा विकास घडवून आणता येईल याचा विचार केला पाहिजे. मात्र हा आ. राजूमामा भोळे हे विकास कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. सागर पार्क येथे जॉगिंग ट्रॅकचे काम गेल्या तीन वर्षांपासून मंजूर आहे. त्याचा ठेका मक्तेदारांना दिलेला आहे. या भागातील नगरसेवक तसेच शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी हे या साठी मध्यंतरी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसले होते.
मंगळवारी मात्र राजूमामा भोळे यांनी आयुक्तांना निवेदन देत काम रद्द करण्याची मागणी केली आहे. या कामाची मागणी नेमकी काय हे त्यांनी समजून घेतलेले दिसत नाही. येथे खेळण्यासाठी येणारे तसेच जॉगिंग ट्रॅकसाठी येणारे खेळाडू व नागरिक यांच्याशी आ. भोळे यांनी चर्चा केलेली नाही. सागर पार्कला चारही बाजूंनी जॉगिंग ट्रॅक घेतलेला आहे.
येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, या मैदानाचा उतार हा आकाशवाणीकडे जाणार्या रस्त्याकडे आहे. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक फक्त तीन बाजूला तयार करून कंपाउंड लावून पाच फुटाची जॉगिंग ट्रॅक तयार करा. म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही, अशी मागणी लोकांची आहे. मात्र आ. भोळे यांनी दिलेले निवेदन दिशाभूल करणारे आहे. शहराचा विकास आज प्रलंबित राहिलेला आहे. महत्त्वाच्या सागर पार्क मैदानावर विकास काम होत असताना त्यात खोडा घालण्याचे काम आमदार करीत आहेत . या मैदानात विजेची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था झाल्यास येथील प्रश्न सुटतील. तसेच पाण्यासाठी बोरिंग केले तर आणखी विकासात भर पडेल. मात्र आमदारांची दूरदृष्टी नष्ट झाली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, असाही आरोप नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला आहे.