भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची तीन सामन्यांची टी२० मालिका आज संपन्न झाली. भारतीय संघाला या सामन्यात १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावे केली होती. या ‘हाय प्रोफाइल’ मालिकेनंतर आयसीसीने टी२० संघांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान अव्वल स्थानासाठी काट्याची लढत होत असल्याचे दिसून येतेय. टी२० विश्वचषक विजेता असलेला, वेस्ट इंडिज संघ आश्चर्यकारकरित्या या क्रमवारीत दहाव्या स्थानी आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेनंतर आयसीसीने नुकतीच आयसीसी टी२० संघांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत संघांच्या स्थानांमध्ये काहीही बदल झाला नाही. मात्र, अव्वल स्थानासाठी चुरस नक्कीच वाढली आहे. या क्रमवारीत इंग्लंडच्या संघाने आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे. त्यांचे २७५ रेटिंग गुण आहेत. भारताविरुद्ध २-१ असा पराभव पत्करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाने देखील आपले दुसरे स्थान सोडले नाही. त्यांच्या नावे २७२ रेटिंग गुण जमा आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये चार वर्षांनंतर टी२० मालिका विजय साजरा करणारा भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियापेक्षा त्यांचे फक्त चार गुण कमी आहेत.
टी२० सांघिक क्रमवारीत इंग्लंड बऱ्याच काळापासून अव्वल स्थानी आहे. इंग्लंडने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत ३-० असे निर्णय यश मिळवत, क्रमवारीतील आपले प्रथम स्थान मजबूत केले होते.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतापाठोपाठ पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांचे अनुक्रमे २६२ व २५२ रेटिंग गुण आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा अव्वल दहामध्ये समावेश आहे. धक्कादायक म्हणजे टी२० विश्वचषक विजेता वेस्ट इंडिज संघ दहाव्या स्थानी आहे.