जळगाव – मास्टर कॉलनीत एका घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून दरवाजाची कडी उघडून घरात ठेवलेले चार मोबाईल आणि रोकड लंपास केल्याचे सोमवारी उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील मास्टर कॉलनीत राहणारे जावेद नबी काकर (वय-३२ रा. बरकाती चौक मास्टर कॉलनी) हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
शनिवारी रात्री १० वाजता ते जेवण करून कुटुंबियांसह झोपले. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घराच्या खिडकीतून हात घालून घराचा दरवाजा उघडला.
घरातील हॉलमध्ये असलेले १२ हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल आणि घरात ठेवलेले ८ हजार रूपये रोख रूपये लांबविले आहे. सकाळी पाच वाजेच्या सुमारास जावेद काकर हे झोपेतून उठल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला. तर घरात असलेले चारही मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले.
सोमवारी सायंकाळी उशीरात जावेद काकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.