मुंबई : सध्या अनेक बाबतीत आघाडीवर असणार्या रिलायन्स जिओने एक नवीन घोषणा केली आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख आणि अब्जाधीश उद्योजक मुकेश अंबानी यांनी मंगळवारी ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस’ येथे ५ जी सेवेबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ २०२१ च्या मध्यानंतर ५ जी सेवा सुरू करेल.
तसेच ५ जीसाठी धोरणात बदल करण्याची आणि प्रक्रियेला वेग देण्याची आवश्यकता असल्याचेही अंबानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जोपर्यंत धोरण सोपे आणि स्वस्त केले जात नाही तोपर्यंत ते शक्य नाही. त्याच वेळी, भारतात ३० कोटी २ जी फोन ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये आणण्याविषयीसुद्धा त्यांनी भाष्य केले आहे.
रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले की, २०२१ मध्ये जिओ भारतात ५ जी क्रांती घडवून आणेल. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर व तंत्रज्ञानही स्वदेशी असेल. आम्ही जिओच्या माध्यमातून स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करू. जिओ ५ जी क्रांतीचे नेतृत्व करेल. पुढे बोलताना अंबानी म्हणाले की, भारताने ५G स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. भारत येत्या काही दिवसांत सेमी कंडक्टर मैन्युफैक्चरिंग हब बनू शकेल. आपण केवळ सेमी कन्डक्टरच्या आयातीवर अवलंबून राहू शकत नाही.
यावेळी अंबानी म्हणाले की, या २ जी ग्राहकांना डिजिटल बदलांचा फायदा घेता येणार आहे. आज भारत हा जगातील सर्वाधिक ‘डिजिटली कनेक्ट’ देश आहे. ते म्हणाले की, आजही देशातील ३० कोटी ग्राहक टू-जीमध्ये अडकले आहेत आणि त्यांना स्मार्टफोनमध्ये आणण्यासाठी धोरण आखणे आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून हे ग्राहक डिजिटल व्यवहारही करु शकतील.


