बोदवड प्रतिनिधी । बोदवड ते जामठी रस्त्यावर असणार्या साई मंदिरात माजी सरपंच तथा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम देवराम पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून पलायन केल्याचे खळबळ उडाली आहे.
माजी सरपंच तथा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम देवराम पाटील (उर्फ बाळू पाटील) हे सायंकाळी दर्शनासाठी गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून पलायन केले. पाटील यांनी केलेला आरडा-ओरडा ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलविले. बोदवड येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. पूर्व वैमनस्यातून पुरूषोत्तम पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची चर्चा असली तरी अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.