जळगाव- : येथील नूतन मराठा महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हिंदी व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार” या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून क.ब.चौ. उ.म. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ मोहन पावरा होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा डॉ.राहुल संदानशिव यांनी महापरिनिर्वाण दिनाचे महत्व सांगून त्यांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना मुख्य वक्ते डॉ. मोहन पावरा यांनी, समाजाला जागृतीचा विचार देणारा महामानव अशा शब्दात गौरव केला. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.
बाबासाहेबांच्या स्त्री पुरुष समानता, रिजर्व बँक स्थापनेत असलेला सिहाचा वाटा तसेच महिला व बालकामगार यांना होणाऱ्या शोषणा पासून मुक्त करणे असे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. ते फक्त दलितांचेच कैवारी नसून संपूर्ण पीडित समाजचे नेतृत्व करायचे.असंख्य पीडित समाजासाठी काम करणारे बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिनिधी होते. त्यांच्या कार्याचा तळागाळातील समाजाला फायदा झाला आहे. त्यांचे विचार आजची बहुजनांना संजीवनी देण्याचे काम करतात असे त्यांनी संगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. एल.पी देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महामानव डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे प्रसाराचे कार्य करण्यासाठी महाविद्यालय नेहमी विविध उपक्रमातून प्रयत्न करीत असल्याचे सांगितले .तसेच बाबासाहेबांच्या शैक्षणिक,सामाजिक विचारांचा आढावा घेऊन त्यांचे विचार हे मानवतेसाठी किती महत्वाचे आहे हे संगीतले. कोरोना महामारीच्या काळात जरी आपले जनजीवन प्रभावित झाले असले तरी महामानवाचे विचार थांबवण्यात कोरोना अपयशी झाला आहे.शेतात काम करणारा विद्यार्थी जेव्हा काम करत असताना येथे ऑनलाइन जोडला जातो तेव्हा याची प्रचिती येते असेही त्यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ राहुल संदानशिव यांनी सुत्रसंचालन भुपेंद्र बाणाईत,परिचय – डॉ अफाक शेख,आभार- पल्लवी शिंपी यांनी केले. कार्यक्रमाला उप प्राचार्य डॉ एन जे पाटील,उपप्राचार्य आर बी देशमुख, डॉ. डी.आर.चव्हाण आदी उपस्थित होते.