जळगाव प्रतिनिधी । शहरात चोरीच्या दुचाकी दोन जण घेवून फिरत असल्याची माहिती मिळताच गोविंदा रिक्षा स्टॉप येथून चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या दोघांना तालुक्यातील घार्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी ८ वाजता अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहरात चोरीच्या दुचाकी दोन जण घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तालुक्यातील ममुराबाद, धामगांव शिवारात शोध घेण्यासाठी पथकाला रवाना केले. दरम्यान दोन्ही संशयित आरोपी हे तालुक्यातील घार्डी फाटा येथेील एका पान टपरीवर उभे असल्याचे दिसले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांची चौकशी केली असता दोघांनी जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. दिपक भास्कर सपकाळे (वय-२४) आणि ईश्वर जगन्नाथ सपकाळे (वय-२८) दोन्ही रा. धामणगाव ता. जि.जळगाव असे अटक केलेल्या संशितय आरोपींची नावे आहेत. दोघांना ताब्यात घेवून जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रविंद्र गिरासे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, शरद भालेराव, नितीन बाविस्कर, राहुल पाटील यांनी ही कारवाई केली.