जळगाव – सध्या वॉटरग्रेस कंपनीबाबत संशयात्मक चर्चा सुरू असून नगरसेवकांची कथित पाकिटे देखील चर्चेत आहेत. यातच शिवसेना या विषयावर गप्प असल्याबद्दलही चर्चा होऊ लागली होती. या संदर्भात आज शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेने पहिल्यापासून कचर्याच्या ठेक्याबाबत घेतलेली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून आमच्या नगरसेवकांनी पाकिटे घेतली नसून असे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होईल असे प्रतिपादन आज शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी या प्रकरणी पक्षाची भूमिका मांडली.
यावेळी अनंत जोशी म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात आपण कचर्याच्या ठेक्याबाबत आंदोलन केले होते. यानंतर काही कथित समाजसेवकांनी आपल्या आंदोलनाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित केले होते. याच्यामुळे आपण व्यथीत झालो होतो. यामुळे आपण काही काळ याबाबत भाष्य केले नव्हते. वॉटरग्रेसला मिळालेला ठेका, याच्या मागचे राजकारण याबाबत आम्ही भाष्य केले नव्हते. ठेकेदार बदलण्यापेक्षा काम चांगले होणे महत्वाचे होते. हा शिवसेनेचा पहिल्या दिवसापासूनचा उद्देश होता. याबाबत सुनील महाजन यांनी कालच भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन केले तरी पाप…नाही केले तरी पाप…अशी अवस्था झाल्याबद्दल अनंत जोशी यांनी खंत व्यक्त केली. या सर्व प्रकारात जनतेच्या पैशाची नासाडी होत असून कामे थांबली असल्याचे ते म्हणाले.
तसेच वॉटरग्रेस कंपनीच्या प्रकरणात पाकिटे चर्चेत आले आहेत. आधी अभिषेक पाटील यांनी पाकिटाचा विषय केला होता. आपण माझ्या आयुष्यात कधीच कुणाला फसवून लुबाडून पैसे कमावला नाही. मी कचर्याचे पैसे खाल्ले नाही, खाणारही नाही ! मी जोशी आहे…मात्र ज्योतीषी नाही. यामुळे जे घेणारे घेतात….देणारे देतात. ही रेग्युलर प्रॅक्टीस आहे. हा प्रकार थांबायलाच तयार नाही. यामुळे शहराचे वाटोळे होत आहे.
यादरम्यान अनंत जोशी म्हणाले की, शहरातील कचर्याचा ठेका हा तिसर्यांदा भेटलेला आहे. मूळचा वॉटरग्रेसचा ठेका, नंतर उपठेका आणि नंतर पुन्हा वॉटरग्रेस असा हा प्रकार आजवर घडलेला आहे. आम्ही पाकिटे घेतलेले नाहीत. असे आढळून आले तरी त्या नगरसेवकाच्या विरोधात सर्वप्रथम आपण उभे राहू असा इशारा अनंत जोशी यांनी याप्रसंगी केला.