मुंबई – आधीच तोटय़ात असलेल्या एसटी महामंडळाचे चाक कोरोना लॉकडाऊनमुळे आणखीनच खोलात गेले आहे. राज्य सरकारने नुकतेच एसटी महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे.
लॉकडाऊनपूर्वी एसटीला दरमहा असलेला 50 कोटींचा तोटा होत होता. आता तो 350 कोटींपर्यंत पोहचला आहे. पूर्वी एसटीचे दररोजचे उत्पन्न 22 कोटी रुपये होते. आता एसटीला दररोज केवळ 12 कोटींचे उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न 24 कोटींवर नेणार म्हणजे दुप्पट करण्याचे ध्येय एसटी महामंडळाने बाळगले आहे.
एसटीने कोविड काळामध्ये लाखो मजुरांची वाहतूक करीत त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यास मदत केली, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱयांसाठी सेवा दिली, ऊस तोडणी कामगार, परराज्यात असणारे विद्यार्थी आदींची वाहतूक तसेच अत्यावश्यक वस्तूंची मालवाहतूक करण्यासाठी एसटीने शर्थीचे प्रयत्न केले. लॉकडाऊन काळात एसटीची ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
या काळात दररोज सरासरी 22 कोटी रुपये याप्रमाणे तब्बल सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या महसूल गमवावा लागला. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या आर्थिक स्थितीवर झाला असून दरमहा 50 कोटी रुपयांचा असलेला तोटा सध्या 350 कोटी रुपयापर्यंत पोहचला आहे.
तीन हजार मालवाहू वाहने तयार करणार
एसटीने मालवाहतुकीतून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने भविष्यात 3 हजार मालवाहने तयार करण्यात येणार आहेत. भविष्यात 25 टक्के शासकीय मालवाहतूक एसटीद्वारे करण्याचा प्रयत्न आहे. तसेच एसटीच्या टायर पुनरःस्थिरीकरण प्रकल्पाचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहकार्यातून, मार्च 2021 पर्यंत किमान पाच पेट्रोल/डिझेप पंप सर्वसामान्यांसाठी सुरू करून त्यातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न आहे.
2023 पर्यंत एसटीच्या सुमारे 3 हजार बसेस लिक्विफाइड नॅचरल गॅस एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्याची योजना आहे. मोकळ्या जमिनीवर एसटी महामंडळाचा मालकीहक्क शाबूत ठेवून त्यांचा विकास करून उत्पन्न वाढविण्याचीही योजना आहे.
अजून वाचा
अॅड. प्रवीण चव्हाण यांची बीएचआर प्रकरणात नियुक्ती