जळगाव प्रतिनिधी । अॅड. प्रविण चव्हाण यांची बीएचआर पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत कर्तव्यदक्षतेने घरकूल प्रकरण तडीस नेऊन दोषींना शिक्षा ठोठावण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अॅड. प्रवीण चव्हाण यांची बीएचआर प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावातील घरकुुल खटल्यामध्ये अॅड. प्रविण चव्हाण यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यांनी अतिशय तडफेने हा खटला चालवल्याने यातील संशयित दोषी सिध्द झाले असून त्यांना शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे. यासोबत अत्यंत गाजलेल्या डीएसके डेव्हलपरचा आर्थिक गैरव्यवहाराचा खटला, समृद्धी जीवनचा ३ हजार कोटी रूपयांचा खटला, नागपूर येथील गुंड संतोष आंबेकर याच्या मोक्कासंदर्भातील खटला अॅड. प्रविण चव्हाण यांनी लढला आहे.
या पार्श्वभूमिवर, अॅड. प्रवीण चव्हाण यांची बीएचआर प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून झालेली नियुक्ती लक्षणीय मानली जात असून ते ठेविदारांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.