जामनेर प्रतिनिधी । वाकोद येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता प्रशिक्षण सुरु असतांना एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझ्याबाबतही चर्चा चालू असल्या तरी मी कालही भाजपमध्ये आहे, आणि आजही असून उद्या देखील राहणार असणार आहे. असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले.
माझ्या मनात भाजप सोडण्याचा विचारही नाही : खा. रक्षा खडसे
वाकोद येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरच्या समारोप कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न असतो की, नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला तर पुढे मी ही त्या पक्षात जाईल. परंतु मी कालही भाजपात होती, आजही आहे आणि पुढेही भाजपमध्येच राहिल. अनेकांना मुक्ताईनगरात प्रशिक्षण शिबिर होते की नाही ? याबाबत उत्सुकता लागून होती. तथापि, मुक्ताईनगरात प्रशिक्षण शिबिर झाले असून याला दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यकर्त्याने पक्षाने दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहज मिळत नसते, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ, अॅड. शिवाजी सोनार, गोविंद अग्रवाल, दिलीप खोडपे, चंद्रकांत बाविस्कर, अमित देशमुख, अतिष झाल्टे उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे तर आभार रामेश्वर पाटील यांनी मानले.