मुंबई – सध्या बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे, या प्रकारणात अनेक बड्या लोकांची नावे देखील जोडण्यात आली आहेत. यात गिरीश महाजन यांचे सुद्धा नाव घेण्यात आले आहे, म्हणून महाजन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, बीएचआर घोटाळ्याप्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे, त्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.
तसेच आपण बीएचआर पतसंस्थेकडून कधी कर्जही घेतलेले नाही. आपल्यावर होत असलेले आरोपही चुकिचे आहेत. जामनेर तालुक्यात सहा एकर जमीन खरेदीच्या व्यवहारात खाते उताऱ्यावर आपले व पत्नी साधना महाजन यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रिसतर करण्यात आला आहे. ही जमीन पुणे येथील एका उद्योजकाने साडेतीन वर्षापूर्वी खरेदी केली होती. परंतु आता चार महिन्यापूर्वी ‘कोविड’काळात त्याला अडचण आल्यामुळे त्यांनी जमीन विक्रीस काढली आपण त्यांची खरेदी केली असून त्यांला रिसतर बँकेतून धनादेशाव्दारे पैसेही दिले आहेत, त्यामुळे यात गैरव्यवहार करण्याचा प्रश्न येतोच कुठे ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
बीएचआर सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे. यामध्ये लवकरच एकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा देखील गौप्यस्फोट खडसे यांनी केला होता. तसेच या प्रकरणी जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोप केला आहे. हा आरोप देखील गिरीश महाजन यांनी फेटाळून लावला आहे.